निजामपूर बायपासचा प्रश्‍न ऐरणीवर

रस्त्यालगत पार्किंग, अरुंद रस्ता, एमआयडीसीच्या वाढत्या वाहतुकीचे ठरतात बळी

| माणगाव । वार्ताहर ।

दिघी-माणगाव-पुणे या महत्वाच्या राज्य मार्गावरील निजामपूर शहरातून हा मार्ग गेल्यामुळे या ठिकाणच्या बाजारपेठेत दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याकडेला असणार्‍या बेकायदेशीर वाहन पार्किगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. निजामपूर बाजारपेठेत गेल्याच महिन्यात एका तरुणाला आपला नाहक जीव गमवावा लागल्याने निजामपूर शहरातील वाहतुकीचा प्रश्‍नचिन्ह उभा राहिला आहे. वाढत्या अपघातामुळे शहराबाहेरून काढण्यात येणार्‍या बायपासचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याकडे शासनांनी लक्ष देणे गरजेचे आहे असा सूर नागरीकातून उमटत आहे.

निजामपूर विभागातील प्रमुख बाजारपेठ असून बाजारपेठ ही शिवकालीन असल्याने परिसरातील शेकडो गावातील नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात.अवैद्य पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या मार्गावर दोन मोठी वाहने आल्यास अरुंद रस्त्यामुळे वाहने रस्त्याच्या साईड पट्टीने चालतात. त्यातच रस्त्याकडेला उभे असणारी अवैद्य पार्किग यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच निजामपूर पासून जवळ असणार्‍या विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात जाणारी व येणारी अवजड वाहने, कर्मचारी व कामगार ने-आण करणारी कंपनीच्या बस यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिकच बिकट झाला आहे.

Exit mobile version