बाबा…लगीन… कधी होणार माझं ? चाळीशी पार केलेल्या अविवाहितांचा सवाल

मुलींच्या अवास्तव अपेक्षेने शेकडो युवक बिनलग्नाचेच
अलिबाग | नेहा कवळे |
लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून अशी एक म्हण मराठीत आहे.या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात साध्य होतीलच असं काही नाही. अनेकदा घर होते पण घराची शोभा वाढविणारी बायकोच मिळत नसते.त्यात हल्लीच्या मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षेने तर प्रत्येक समाजात हजारो तरुन चाळीशी पार केले तरी अविवाहित राहू लागल्याने समाजात मोठी अविषमता निर्माण होऊ लागली आहे.यामुळे अनेक कुटुंबात बाबा,लगीन…कधी होणार माझ..अशी विचारणा केली जात आहे.
साधारणपणे तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होते. पण ग्रामीण भागातील मुलांना मुली मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या असताना शेती करणारे किंवा कमी पगाराच्या मुलांना मुली मिळणे अवघड झाले आहे.यामुळे यावर्षीही लग्नसराईला मुहूर्त मोठ्या प्रमाणात असले तरी अनेक कुटुंबात विवाहच ठरत नसल्याने पुढच्या वर्षी बघू असा सूर आळविला जाऊ लागला आहे.
सरकारी नोकरी करणारा नवरा हवा अशी आता अलीकडच्या मुलीची पहिली पसंती झाली आहे. उत्तम नोकरी असणार्‍या स्थळाला लगेच मुलगी मिळते. मध्यम नोकरी, व्यापार असणार्‍याला थोडे झगडावे लागते आणि शेती करणार्‍या मुलाला मुलगीच मिळणे दुरापास्त झाले आहे. नोकरी देखील सरकारी असेल तर प्रथम प्राधान्य दिले जात आहे. यामुळे वरपक्षाच्या बापाची डोकेदुखी वाढली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांबरोबर लग्न करण्यासाठी सहजासहजी मुली तयार होत नाहीत. मुली शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. आपण सुशिक्षित व शिकलेले असल्यामुळे आपल्याला जोडीदार हे असाच हवा अशा मुली आई-वडिलांच्याकडे आग्रह धरतात.सध्याच्या मुलींची वर पक्षाबद्दल व भावी नवर्‍याबद्दल खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. शेतकरी मुलांशी लग्न करण्यास मुली स्पष्टपणे नकार देत आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या मुलांची लग्न जमवताना अनेक अडचणी येत आहेत.
गतकाळामध्ये घरातल्या मुलीच्या लग्नाची चिंता संपूर्ण कुटुंबाला लागून रहायची, मात्र सद्यस्थितीत परिस्थिती बदललेली आहे. लग्नाचे वय झाले तरी मुलांची लग्न होत नसल्याने पालक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, कुटुंब एकत्र आणणार्या वधू-वर सूचक मंडळांना देखील शेतकरी कुटुंबातील मुलाचे लग्न जमविताना अग्नीदिव्य पार करावे लागत आहे. सरकारी नोकरदारांपेक्षा काही शेतकर्यांचे उत्पन्न अधिक असूनही मुलांची लग्न रखडली आहेत. वधू-वर सूचक मंडळांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत. शेतकरी मुलांचे वडील मुलांचा लग्नाचा बायोडाटा घेऊन त्यांच्याकडे अपेक्षेने जात आहे. मात्र मुलींच्या अपेक्षेपुढे वधू-वर सूचक मंडळांनी हात टेकले आहेत.
कमी पगाराच्या मुलांची अडचण
कमी पगार असल्यास स्वतःसह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार? याचा विचार करून वधू कुटुंब कमी पगाराच्या मुलांना मुली देण्यास टाळाटाळ करीत असतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या असल्याने अशा मुलांसमोर तर आणखीच प्रेचप्रसंग निर्माण झाला आहे.
हात पिवळे कधी होणार
शिक्षण त्यानंतर नोकरीच्या शोधात असलेले तरूण नोकरी मिळता मिळता तिशी ओलांडतात. व नंतर मुली मिळताना आणखी पाच सहा वर्षे अशीच जातात. त्यामुळे लग्नाच्या वेळेला अशा मुलांचे वय आडवे येते. मुला, मुलीच्या वयात जास्त अंतर नसावे याकारणाने चाळीशी ओलांडलेल्या मुलांना लग्नाकरीता वधू शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.


सध्याच्या युगात मुलींचे शिक्षण जास्त असल्यामुळे त्यांना जोडीदारही खूप शिक्षित लागतो. परंतु कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यावर मुलांना तेवढे शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे नोकरी चांगली असली तरी कमी शिक्षणामुळेही मुलांची लग्न होत नाही. यासाठी मुलींनी व तिच्या घरच्यांनी थोडी तडजोड करावी.
महेश मढवी,युवक दिघोडी, सासवणे

मुलींच्या वाढत्या अपेक्षेमुळे मुलांना मुली मिळणे कठीण होऊन बसले आहे. वधु वर सुचक मंडळांनीही मुलींच्या मागण्यांपुढे हात टेकले आहेत. साधारण नोकरी किंवा धंदा करणार्या मुलांचे लग्न ठरविताना दमछाक होत आहे.
परशुराम पाटील, पालक, अलिबाग

Exit mobile version