राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; मोदी सरकारची घोषणा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
खेलरत्न हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले होते. परंतु, आता या पुरस्काराचे नामांतर करण्यात आले आहे. आतापासून हा पुरस्कार ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणार आहे. याबाबतची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.
‘खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती करणारे संदेश मला देशभरातून येत होते. मी या सर्व नागरिकांचे त्यांच्या मताबद्दल आभार मानतो. देशवासियांचे मत लक्षात घेऊन, खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल,’ असे मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले.
‘मेजर ध्यानचंद हे भारताच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी भारताला गौरव आणि अभिमान वाटावा अशी कामगिरी केली होती. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या क्रीडा पुरस्काराला त्यांचे नाव देणे योग्यच आहे,’ असेही मोदींनी ट्विटमध्ये लिहिले. 1991-92 सालापासून खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून, सर्वात पहिल्यांदा हा मानाचा पुरस्कार महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला मिळाला होता. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत 25 लाखांचे रोख बक्षीस आहे.