बंगालचा उपसागर, ईशान्य भारताचा भाग व्यापला
| पुणे | प्रतिनिधी |
नैऋत्य मान्सून दोन दिवस आधीच गुरुवारी (दि.30) मे केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान, मान्सूनचा वेग अधिक असून, तो वेगाने पुढे सरकत आहे. शनिवारी (दि.31) मे मान्सून आणखीन थोडा पुढे सरकला असून, सध्या मान्सूनने बंगालचा उर्वरित भाग आणि ईशान्य भारताचा आणखी काही भाग व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून ईशान्य बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात, त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा उर्वरित भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे. नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप क्षेत्र, केरळ, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकरणार असल्याचेदेखील हवामान विभागाने म्हटले आहे.