| पुणे | प्रतिनिधी |
राज्यातील कोरोना संसर्गातील वाढ कमी होऊ लागली असून, मागील दहा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात या वर्षभरात कोरोनाचे 2 हजार 395 रुग्ण आढळले असून, 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात मे आणि जूनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू होती. त्यामुळे राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 11 ते 13 जून या कालावधीत शंभरवर पोहोचली. त्यानंतर 14 जूनपासून रुग्णसंख्येत घट होऊन ती जवळपास निम्म्यावर आली. तेव्हापासून कोरोना संसर्गातील वाढीचा वेग कमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत करोनाचे 25 रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई 8, नागपूर महापालिका 5, चंद्रपूर 3, छत्रपती संभाजीनगर महापालिका 2 आणि पुणे महापालिका, पुणे जिल्हा, ठाणे महापालिका, नवी मुंबई, भिवंडी, कोल्हापूर महापालिका, अकोला महापालिका प्रत्येकी 1 अशी रुग्णसंख्या आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
राज्यात 1 जानेवारी ते 24 जूनपर्यंत 26 हजार 736 संशयित कोरोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 2 हजार 395 रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक 965 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 256 असून, 2 हजार 106 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील 32 रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग (1 जानेवारी ते 24 जून)
कोरोना चाचण्या : 26 हजार 736
एकूण रुग्ण : 2 हजार 395
सक्रिय रुग्ण : 256
बरे झालेले रुग्ण : 2 हजार 106
मृत्यू : 33






