सोमवारी रात्री फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही समाजमाध्यमं ठप्प झाली होती. तब्बल सहा तासांनंतर सेवा पूर्ववत झाली आणि जगभरातील वापरकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान फेसबुकने कॉन्फिगरेशनमध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळे सेवा ठप्प होती अशी माहिती दिली आहे. डेटा सेंटर्सशी नेटवर्क ट्राफिकचं समन्वय साधणार्या राऊटर्समध्ये झालेल्या चुकीच्या बदलांमुळेच सेवा सहा तास ठप्प होती असा फेसबुकचा दावा आहे.
नेटवर्क ट्रॅफिकमध्ये आलेल्या व्यत्ययाचा आमच्या डेटा सेंटरच्या संवाद प्रक्रियेवर परिणाम झाला, ज्यामुळे आमच्या सेवा ठप्प झाल्या, असं फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे. मात्र फेसबुकच्या काही कर्मचार्यांनी आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत चुकीमुळे सेवा ठप्प झाली होती. इंटरनेट ट्राफिक ज्या पद्धतीने सिस्टीमकडे वळवलं जातं त्यात झालेल्या चुकीमुळे सेवा ठप्प झाली असं कर्मचार्यांनी सांगितलं आहे.
मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे.
सोमवारी या कंपनीच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स 4.9 टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासूनच कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणार्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत घसरलेत. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती 12 हजार 160 कोटी डॉलर्सवर आलीय. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेलाय. सोमवारी फेसबुकच्या सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला.
44 हजार कोटींचे नुकसान
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने तसंच कंपनीसंदर्भात झालेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला 600 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 4,47,34,83,00,000 रुपयांचं (44 हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं. समोर आलेल्या माहितीनुसार अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला. मार्क सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानाने खाली आहे.