दाल मे कुछ काला है! बंडखोर आमदार अन् जिल्हाप्रमुखाकडून होतेय दिशाभूल

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |

शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी स्थानिकांच्या रोजगाराबाबत जेएसडब्ल्यूसोबत चर्चा करत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा केल्यानंतर बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी वेगळे पत्र देत जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरभरतीसाठी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकाच पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांची एकाच विषयावर वेगवेगळी भुमीका दिसत असल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
जिल्हाप्रमुखाने कंपनी प्रशासनाची भेट घेतल्यानंतर आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा केला होता. तसे समाजमाध्यमातून जाहिरही केले होते. माध्यमांमध्ये वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यानंतर अवघ्या चार दिवसात शनिवारी आमदार महेंद्र दळवी यांनी कंपनी प्रशासनाला पत्र देत नोकरभरतीबाबत जन आंदोलनाचा इशारा देत जिल्हाप्रमुखाला खोटे ठरविले आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख आणि आमदार यांच्यात एकवाक्यता दिसत नसल्याने या दोघांमध्ये फुट पडली आहे की काय? अशी चर्चा राजकीय गोटातून होताना दिसतआहे. तसेच हे दोघे जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.


बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी 7 फेब्रुवारी रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कंपनीतील भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देण्याबाबतचे निवेदन सादर केले होते. सदर बैठकीनंतर राजा केणी यांनी आपली कंपनीसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करीत समाजमाध्यमांवर माहिती देत तशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनतर आज शनिवारी 11 फेब्रुवारी रोजी आमदार महेंद्र दळवी यांनी जेएसडब्ल्यू कंपनीच्या व्यवस्थापनाला पत्र दिले. त्यामाध्यमातून स्थानिक बेरोजगार उमेदवारांची नोकरभरती तसेच इतर मागण्यांसाठी 27 फेबु्रवारी रोजी जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळया पत्रांमुळे जिल्हाप्रमुख आणि आमदार यांच्यात ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जर कंपनी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा स्वतः जिल्हाप्रमुख करत असताना पुन्हा चारच दिवसात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यामागे नेमके काय कारण असावे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या दोन वेगवेगळ्या पत्रांमुळे जिल्हाप्रमुख आणि आमदारांमध्ये फुट पडली की, काय अशी चर्चा केली जात आहे.

Exit mobile version