| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन आगाराकडून लांब पल्ल्याच्या व मध्यम लांब पल्ल्याच्या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील खासगी बसेस सोडण्यात येत आहेत. परंतु, या मार्गावर नादुरुस्त बसेस देण्यात येत असल्याने प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन आगाराची कोलमांडला- श्रीवर्धन- मुंबई ही भाडे तत्वावरील खासगी बस सकाळी सव्वा अकरा वाजता मार्गस्थ होते. रविवारी (दि.15) सदरची बस ही नियोजित वेळेपेक्षा सव्वा तासाने मुंबईकडे मार्गस्थ झाली. साडेबारा दरम्यान श्रीवर्धन स्थानकातून सुटलेली बस अत्यंत धीम्या गतीने तसेच नागोठणे ते खारपाडा दरम्यानचे सर्व थांबे घेत असल्याने प्रवासी वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रवासी वर्गाने चालकास धीम्या गतीने बस चालवण्याचे कारण विचारले असता, बसमध्ये काही तरी बिघाड झाला असेल असे उत्तर दिले. श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गस्थ होणाऱ्या खासगी बसेस ची नियमित तपासणी होते की नाही. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेसना नागोठणे ते खारपाडा दरम्यानचे इतके थांबे कोणाच्या आदेशावरून देण्यात आले आहेत असा प्रश्न प्रवासी वर्गाने उपस्थित केला.
बस वेग घेत नव्हती. त्यातही अनेक थांबे यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला. आगारात नादुरुस्त बसेस कडे लक्ष द्यावे तसेच नागोठणे ते खारपाडामधील सर्व थांबे रद्द करण्यात यावेत. प्रवासी वर्गाला जलद बसेस चे तिकीट घेऊन कंटाळवाणा प्रवास करावा लागतोय.
-गणेश पोलेकर
श्रीवर्धन
