महापालिकेवर फडकणार लाल बावटा: माजी आ. बाळाराम पाटील

इनामपुरीतील भाजपाचे कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकरणार, असा विश्वास माजी आ. बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. पालिकेतील भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत इनामपुरी गावातील तुषार पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाळाराम पाटील बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने जोरदार तयारी सुरू केली असून, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत निवडणुकीत उतरायचे संकेत यावेळी पाटील यांनी दिले.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील इनामपुरी गावातील संतोष पाटील, मनोज पाटील पेठ, यज्ञेश्वर पाटील मुर्बी आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली इनामपुरी गावातील तुषार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष हा लढवय्या पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि आज या पक्षप्रवेशाने इनामपुरी गाव हे शेकापमय झाल्याचे पहावयास मिळत आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेमधील जनता ही भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांना बदल हवा आहे आणि तो बदल आपण या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून देऊ, असेही सांगितले.

या पक्षप्रशाच्या वेळेस आपले मनोगत व्यक्त करताना काशिनाथ पाटील यांनी सांगितले की, होऊ घातलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पक्ष, असे सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवत आहोत आणि या वेळेस आपली सत्ता पनवेल महानगरपालिकेत निश्चितपणे येईल.

यावेळी तुषार पाटील यांच्यासोबत परशुराम बाळाराम पाटील, तुषार परशुराम पाटील, रिना तुषार पाटील, अंगत मारुती पाटील, संदेश भरत म्हात्रे, कुणाल गजानन पाटील, अरविंद गजानन पाटील, अक्षय परशुराम पाटील, अमोल संतोष पाटील, दिपक नरेश भोईर, सचिन भरत म्हात्रे, जितेश जगन्नाथ म्हात्रे, किरण मदन म्हात्रे, मिलिंद जगन्नाथ म्हात्रे, उदय सुरेश म्हात्रे, राज रमेश म्हात्रे आदींनी पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमास बाळाराम पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, भात गिरणीचे चेअरमन रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर पाटील, माजी नगरसेवक गोपाळ भगत, अनंता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version