। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील बालकांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी गाभा समितीच्या शिफारशी नुसार एप्रिल 2021 मध्ये कर्जत येथे कुपोषण बालकांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी 10 बेडची क्षमता असलेले केंद्र मंजूर झाले आहे. मात्र, या पुनर्वसन केंद्र म्हणजे एनआरसी सुरु होण्यास मुहूर्त अद्याप येताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील 120 सॅम आणि मॅम मधील कुपोषित बालकांवर उपचार वेळेवर होत नाहीत. कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी कर्जत येथे आरोग्य विभागाने एनआरसी मंजूर केली आणि त्यासाठी आवश्यक असलेला सर्व स्टाफची नेमणूक देखील केली. त्यातील बालरोग तज्ञ हे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आहेत. त्यातचवेळी दोन आरोग्यसेविका, दोन परिचारिका, एक आहार विशेषज्ञ आणि एक आचारी यांच्या नेमणुका होऊन हे सर्व कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एनआरसीसाठी रुजू देखील झाले आहेत.सर्व स्टाफ उपलब्ध असताना आणि एनआरसीसाठी पुरेशी जागा कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असताना कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आवश्यक असलेले बाळ उपचार आणि पुनर्वसन केंद्र अद्याप सुरु झाले नाही.
- आम्ही कर्जतच्या एनआरसी केंद्रासाठी जागा निश्चित केली आहे. त्याशिवाय तेथे एनआरसीसाठी शासनाच्या निकषाप्रमाणे आवश्यक असलेल्या स्टाफ देखील मंजूर झाला आहे. त्यामुळे काही त्रुटी असल्यास त्या दूर करून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आलेल्या जातील.-डॉ.सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक
- पाठपुरावा करणारे आमच्या संस्थेचे अशोक जंगले हे आज या जगात नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्टेटच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेले केंद्र सुरु व्हावे आणि जंगले यांच्या कार्याला त्यातून श्रद्धांजली वाहावी अशी आमच्या संस्थेची इच्छा आहे. त्यातून तालुक्यात सध्या असलेली 120 सॅम आणि मॅम मधील कुपोषित बालकांवर उपचार व्हावेत.-जगदीश दगडे, कार्यकर्ते दिशा केंद्र स्वयंसेवी संस्था.