अखेर मुहूर्त मिळाला!

मुरुड-एकदरा पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-एकदरा महत्त्वाचा पूल हा 90 वर्षे जुना असून, या पुलावरुन एकदरा, माझेरी, राजपुरी, खोरा, डोंगरीवरचे सर्व ग्रामस्थ मुरुड शहराकडे रोजच्या रोज ये-जा करीत असतात. याच पुलावरुन पर्यटक ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली होती. अखेर पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला असू, कामाला सुरूवात झाली आहे.

देशात दळणवळणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिल्यामुळेच भारतातील ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या व खेडी एकमेकांना जोडली गेली. त्यासाठी विस्तीर्ण रस्त्याचे जाळे विणले गेले असून, वाटेत येणारे नैसर्गिक नाले, नद्यांवर मोठमोठे पूल बांधून अनेक गावे एकमेकांना जोडली गेली. परंतु, मुरुड एकदराला जोडणारा महत्त्वाचा पूल अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धोकादायक बनला होता. या पुलावरचे सुरक्षित कठडे व बेरिंग पूर्णतः खराब झाल्याने मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी एकदरा पूल धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते.

यासंदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने वरिष्ठ विभाकडे दिला होता. मागील अर्थसंकल्पामध्ये तरतूद करुन या पुलाच्या दुरुस्तीकरिता अंदाजे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम ठाणे येथील संरचना कंपनीला देण्यात आले असून, आज या कामाला सुरुवात झाली आहे.

संपूर्ण पुलाचे मजबुतीकरण होणार आहे. हे काम करत असताना रस्ता बंद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तसेच हे काम कमीत कमी चार महिने चालणार आहे.

प्रशांत कांबळे, अभियंता, संरचना कंपनी
(छायाचित्र : गणेश चोडणेकर)
Exit mobile version