साळाव पुलाचे दुरूस्तीच काम संथगतीने

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

साळाव पुलाची दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केली आहे. गेले दोन-तीन महिने पुलाच्या दुरूस्तीचे काम पाहता, पुढील काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसते. साळाव पुलाचे काम सुरू असल्याने अवजड वाहतुकीस पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. फक्त पाच टन वजनाची वाहने येथून जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे फक्त लहान वाहने सोडली तर बसेस, मालवाहतूक ट्रक आदी अजवड वाहने साळाव पुलावरून नेण्यास बंदी आहे.

साळाव पूल अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यास मध्यवर्ती ठिकाण आहे. परिणामी, या तिन्ही तालुक्यांवर साळाव पूल अवजड वाहतुकीस बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या तोट्याचे व नुकसानीचे ठरते आहे. दरम्यान, विविध व्यवसायांवरसुद्धा याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच मुरूडकडे जाण्यासाठी साळाव पुलाव्यतिरिक्त पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास अंतर खूपच असल्याने वेळेचा अपव्यय होतो. साळाव पुलावरून मोठ्या बसेसना बंदी असल्याने मुरूडकडे येत असलेल्या पर्यटकांची संख्या काहीशी कमी झाल्याचे जाणवते. सुट्टीचे दिवस असूनसुद्धा पर्यटकांची संख्या रोडावलेली दिसते. पुलाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने गांभीर्याने लक्ष द्यावे व कामाचा वेग वाढवावा, अशी सर्व स्तरातूत मागणी केली जात आहे.  

Exit mobile version