कर्नाळा किल्ल्याचा अहवाल वन विभागाकडे सुपूर्द

| पनवेल । वार्ताहर ।

मुंबईपासून काही मिनिटांच्या अंतरावर असणारा कर्नाळा किल्लावर ऑगस्ट महिन्यापासून दुरुस्तीमुळे पर्यटकांसाठी प्रवेश बंदी वन विभागाने केली आहे. या किल्यावरील दुरुस्तीबाबत अहवाल वन्यजिव विभागाला शनिवारी सुपुर्द करण्यात आला. तसेच ऐतिहासिक कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड अभयारण्याची ओळख सांगणारा एकही लोगो आतापर्यंत नव्हता. या लोगोबद्दल ऑक्टोबर महिन्यात स्पर्धा घेण्यात आली. यातील निवडक लोगोंचा लोकार्पण सोहळा शनिवारी पनवेल येथे पार पडला.

वर्षाला सूमारे लाखभर पर्यटक कर्नाळा किल्याला भेट देतात. यामध्ये पक्षी निरिक्षकांची संख्या मोठी आहे. मात्र वन विभागाच्या किल्ला जिर्णोधाराचे काम संथगतीने सूरु असल्याने हा किल्ला पर्यटकांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. नूकतेच 29 आणि 30ऑक्टोबर दरम्यान झालेल्या शेवटच्या पक्षीगणनेनुसार कर्नाळा पक्षी अभयारण्यात 109 पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचे आढळले आहे. किल्ल्यांचा जिर्णोधराची जबाबदारी पुरातत्व विभागाची असली तरी शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. वन विभागाच्या ताब्यात असणारा किल्ला शासनाच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरण करावा अशीही मागणी किल्ले संशोधकांकडून होत आहे. या किल्याच्या जिर्णोधारासाठी मुंबईतील किल्ले संशोधक गणेश रघुवीर यांनी कर्नाळा 14व्या शतकातील कर्नाळा किल्ल्याच्या संवर्धनाच्या उपाययोजनांचा अहवाल वन विभागाला सादर केला आहे.

या अहवालात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची धोकादायक कमानी बाबत तसेच सुरक्षा रेलिंगमुळे पर्यटकांच्या सूरक्षेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. झाडा झुडपांच्या वाढीमुळे येथील तटबंदी आणि बुरुजाच्या काही भागांना तडा गेल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालातील महत्वाचे निरिक्षण कर्नाळा किल्ल्याची देखभाल राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. माहितीसाठी या परिसरात जीवशास्त्र विभाग, सार्वजनिक माहिती आणि मार्गदर्शकांचे फलक लावण्याची गरज असल्याचे ठळक नमूद केले आहे. शनिवारी पनवेल येथील पक्षी अभयारण्याच्या परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) नंदकिशोर कुपटे, किल्ले संशोधक गणेश रघुविर, वन अधिकारी सरोज गवस हे उपस्थित होते. कर्नाळा किल्याच्या उंचीमुळे विविध शासकांनी हा किल्ला जिल्ह्याच्या टेहळणी बुरुज म्हणून वापरात होता. किल्याच्या कुंपनाच्या भिंतीमध्ये 19 विविध पाण्याच्या टाक्या आहेत. शनिवारच्या लोगो लोकार्पणाच्या कार्यक्रमात मीरा रोडचे रहिवासी संकेत मोरे आणि डोंबिवलीचे रहिवासी सुनीत म्हात्रे यांच्या कलाकृतीतून साकारलेले लोगो वनविभागाने निवडल्याचे जाहीर केले.

Exit mobile version