चिरनेरमध्ये गैर प्रकाराविरोधात महिला आक्रमक
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर गावात महिलांच्या पुढाकारातून दारूची बाटली आडवी करण्यात आली आहे. अर्थातच दारू बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री होत होती. या गैरप्रकाराविरोधात येथील महिला आक्रमक झाल्या. गावात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची सर्रास विक्री होत होती. या गैर प्रकाराविरोधात येथील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी दारू बंद करण्याची मागणी करीत, शुक्रवारी तत्काळ ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेमध्ये महिलासह ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर केला. दरम्यान, या निर्णयाचे महिलांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
चिरनेर ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचे गाव असून सुसंस्कृत म्हणून या गावाकडे पाहिले जाते; मात्र काही वर्षांपासून गावात लपूनछपून अवैध दारू व्रिकी सुरू होती. दारूमुळे घरगुती हिंसाचारांच्या घटना वाढल्या, कौटुंबिक कलह निर्माण झाले होते. मध्यतरी काही तरुणांनी कौंटुबिक कलहातून एका कुटुंबाला मारहाण केल्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली होती. त्यात अशा दारुच्या व्यसनाधीन मुळे गावातील तरुण पिढी मृत्यूच्या दारात उभी ठाकली आहे.त्यामुळे अनेक महिलांचे कुंकू पुसले आहे. असे मृत्यूचे प्रकार, कुटुंब कलह पुन्हा निर्माण होऊ नयेत, या उद्देशातून अखेर चिरनेर गावातील महिलांनीच पुढाकार घेऊन, दारूबंदीकरिता एक पाऊल पुढे टाकले, हे विशेष!
यावेळी सरपंच भास्कर मोकल, अरुण पाटील, पद्माकर फोफेरकर, प्रफुल्ल खारपाटील, सचिन घबाडी, समाधान ठाकूर, दिपक कातकरी, समिर डुंगीकर, भारती ठाकूर, निकिता नारंगीकर, मूणाली ठाकूर, वनिता गोंधळी, जयश्री चिर्लेकर, समुद्रा म्हात्रे, यशोदा कातकरी, जयंवती गोंधळी, ग्रामसेवक रविंद्र गावंड सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावा संदर्भात योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड, उरण तहसील, उरण पोलीस ठाणे, पंचायत समिती उरण, उत्पादन शुल्क विभाग उरण या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र चिरनेर गावातील बाटली आडवी होते की पुन्हा गावात दारुचा महापुर येते याकडे तालुक्यातील तळीराम बरोबर जनतेच्या नजरा भिडल्या आहेत.
महिलांच्या एल्गाराला यश
दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी दारूबंदी केली आहे. दरम्यान आता गावात एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा लढा तेथील महिला अनेक काळापासून देत होत्या. आता त्यांच्या लढ्याला यश आले आहे.
