| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर रेल्वे स्थानक परिसरात पालिकेकडून मोफत स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत असून, त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. खारघर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी, विद्यार्थी, नोकरदारवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. मात्र, स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची कमतरता असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मोफत स्वच्छतागृह सुरू केले. आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात स्वच्छ पाणी, योग्य प्रकाशव्यवस्था, वायुवीजन, हात धुण्यासाठी बेसिन, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छता राखण्यासाठी नियमित साफसफाई तसेच देखभाल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून खारघर रेल्वे स्थानकात मोफत स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहे. पालिकेच्या माध्यमातून स्वच्छतागृहाची देखभाल केली जाणार असल्याचे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांनी सांगितले.







