टी-20 वर्ल्ड कपमधून संघ बाहेर पडताच ‘या’ खेळाडूची निवृत्ती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या सामन्यात नामिबियाच्या संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासोबत टी-20 वर्ल्ड कप 2024 मधील नामिबियाचा प्रवास संपला आहे. संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे. याच कारणामुळे नामिबियाचा संघ सुपर-8 मध्ये पोहोचू शकला नाही. दरम्यान नामिबियाचा स्टार खेळाडू डेव्हिड व्हिसा याने निवृत्ती जाहीर केली आहे.

इंग्लंडविरुद्धचा सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात डेव्हिड व्हिसाने चांगली कामगिरी केली. सर्वप्रथम, त्याने गोलंदाजीमध्ये आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा देऊन 1 विकेट घेतला आणि त्यानंतर फलंदाजीत 12 चेंडूत 27 धावा केल्या, परंतु तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. डेव्हिड व्हिसा हा नामिबियाचा क्रिकेटपटू आहे. ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

व्हिसाने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत केली. 2005-06एसएए प्रांतीय चॅलेंजमध्ये त्याने इस्टर्नसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. देशांतर्गत स्पर्धेतही तो टायटन्सकडून खेळला. 2015 मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला. नंतर त्याने कोलपाक मार्ग निवडला आणि इंग्लंडमधील ससेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळला. एकूणच, डेव्हिड व्हिसाने त्याच्या कारकिर्दीत 15 एकदिवसीय आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने एकदिवसीय सामन्यात 330 धावा आणि टी-20 मध्ये 624 धावा केल्या. व्हिसाने एकदिवसीय सामन्यात 15 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 66 बळी घेतले.

Exit mobile version