पार्किंगच्या असुविधेमुळे समस्या वाढली; वाहनांच्या सुमारे दोन किमीपर्यंत रांगा
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेतील रस्ता खुपच अरूंद रस्ता आहे. याच मार्गावरून अलिबाग-मुरूडकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर दोन अवजड वाहने समोरासमोर आली की मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच रेवदंडा बाजारपेठेतील घरे व दुकाने ही रस्त्यालगत असल्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आपले वाहन उभे करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे ते रस्त्यावरच आपले वाहन उभे करून खरेदीसाठी जातात. परिणाम वाहतुक कोंडीमध्ये त्याची आणखी भर पडते. ही समस्या वर्षानुवर्षे सुरू असून, रेवदंड्यातील वाहतुक कोंडीचा आणि वाहनतळाच्या असुविधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. विशेषतः मुरूड तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस असल्याने येथून पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांना मुरूडला पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना रेवदंडा बाजारपेठ मार्गेच मुरूडकडे जावे लागते. ही बाजारपेठ सुमारे दोन किमी अंतरामध्ये बसलेली असून या बाजारपेठेतील रस्ता अंत्यत अंरूद आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आली की ती पास होईपर्यंत खुप वेळ जातो. त्यातच रेवदंडा बाजारपेठेत आजुबाजुच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी आपली वाहने सोबत घेऊन येत असतात. परंतु, बाजारपेठेतील बहुतांश दुकाने ही रस्त्याला चिकटून असल्यामुळे आणि वाहनतळाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने आपले वाहन कुठे उभे करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. त्यामुळे मिळेल त्या जागी किंवा दुकानासमोर रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदीसाठी जातात. यावेळी मोठे वाहन आले की त्याला या रस्त्यावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच, येथील घरे देखील रस्त्याला खेटून आहेत. त्यामुळे घरातुन बाहेर पडताना त्यांना जिव मुठीत घेऊन बाहेर पडावे लागते. रेवदंडा बाजारपेठेतील अरूंद रस्ता आणि वाहनतळ उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावरच बेशिस्त पणे उभी केलेली वाहने यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेसह वाहतुक कोंडी आणि वाहनतळाच्या असुविधेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाहनांची बेशिस्त पार्किंग
रेवदंडा बाजारपेठेवर रेवदंडा पंचक्रोशीतील गावांसह अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील गावे अवंलबून आहेत. त्यामुळे रेवदंडा बाजारपेठ नित्य गर्दीचे ठिकाण आहे. मात्र, बाजारपेठेतील अरूंद रस्ता आणि वाहनतळाची असुविधा यामुळे ग्राहकांना आपली दुचाकी, चारचाकी, रिक्षा, मालवाहतूक टेम्पो तसेच लहान मोठी वाहने मिळेल त्या जागी बेशिस्तीने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मोठ्या बसेस व मालवाहतूक ट्रक यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे याठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
वाहनतळाची सुविधा अत्यंत गरजेची
बाजारपेठेतील अरुंद रस्ताने दोन मोठी वाहने पास होताना फारच जिकीरीचे असते. शिवाय बाजारेपेठेत कुठेही वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालकांनी रस्त्यात बेशिस्तपणे उभी केलेली लहान मोठी वाहने ये-जा करणाऱ्या मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण करतात. त्यामुळे रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा हायस्कुलदरम्यान नित्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. रेवदंडा बाजारपेठेतील अरूंद रस्ता आणि वाहनतळाची सुविधा नसल्यानेच वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनतळावची सुविधा अत्यंत गरजेची असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
आम्हाला रेवदंडा बाजारपेठ जवळ असल्याने आम्ही खरेदीसाठी नेहमीच या ठिकाणी येत असतो. मात्र, येथील रस्ता अत्यंत अरूंद असल्यामुळे आणि वाहन उभे करण्यासाठी जागा नसल्याने मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिळेल त्या जागी किंवा रस्त्यावरच आपले वाहन उभे करून ग्राहक खरेदीसाठी जातात. त्यामुळे एखादे मोठे वाहन आले की ते संपूर्ण रस्ता व्यापून टाकते. त्यामुळे आमच्या सारख्या खरेदीदारांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
सदाशिव आंग्रे,
ग्राहक







