महायुतीत जागांचा तिढा कायम; तिकीट कुणाला मिळणार याबाबत सस्पेंस


| मुंबई | वृत्तसंस्था |

महायुतीत अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे यवतमाळमध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते संतप्त झालेलं आहेत. दरम्यान संभाजीनगर, नाशिक, कल्याण डोंबिवली, ठाणे सिंधुदुर्गच्या जागेवरही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे महायुतीत बर्‍याच ठिकाणी नाराजीचा सूर आहे. भावना गवळींना उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्याने वाशिममध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आमने-सामने आले आहेत.

वाशिममध्ये दोन नावे चर्चेत
वाशिम यवतमाळच्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. मात्र, 3 दिवस शिल्लक असतानाही उमेदवारी जाहीर न झाल्यानं, सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला. वाशिम-यवतमाळमध्ये भावना गवळींसह मंत्री संजय राठोडांचंही नाव चर्चेत आहे. गवळींविरोधात सर्व्हे असून राठोडांनी लढावं अशी चर्चा शिंदे गटात झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळंच शिंदे गटाच्या पहिल्या यादीतही भावना गवळींचं नाव आलेलं नाही. आता कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर भावना गवळींनीही प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असून शिंदे फडणवीस पुन्हा संधी देतील असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.
ठाणे-कल्याणमध्ये सस्पेंस
फक्त वाशिम यवतमाळच नाही तर महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं कळतं आहे. मंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी निश्‍चित झाल्याची माहिती आहे. ठाण्याची जागाही शिंदे गटाकडेच राहणार असून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्केंचं नाव चर्चेत असून म्हस्केंचं नाव आघाडीवर आहे.कल्याणमधून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील. तर पालघरची जागा भाजपच लढवणार असून भाजपचे उमेदवार राजेंद्र गावितांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरुच आहे.
नाशिकमध्ये रस्सीखेच
नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी प्रचार सुरु केला आहे. तर इथं भाजपचे 3 आमदार आणि 100 नगसेवक असल्याचं सांगून भाजपनंही दावा केलाय. आणि ऐनवेळी भुजबळांनीही एंट्री केली आहे. दिल्लीत माझ्या नावाची चर्चा झाली असून अजित पवार गटाला जागा मिळावी असं भुजबळ म्हणाले आहेत. मात्र नाशिकची जागा आमचीच असल्याचं सांगून नाशिकचा सोडणं शक्य नसल्याचं शिंदे गट म्हणत आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरुन अजूनही अंतिम तोडगा निघताना दिसत नाही. भाजपकडून नारायण राणे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत या जागेवर इच्छुक आहेत. तर शिंदेंचेच मंत्री दीपक केसरकरांनी राणेंना पाठींबा दिला आहे. रविवारी केसरकरांसोबत दरेकर आणि प्रसाद लाड यांची बैठकही झाल्याचीही माहिती आहे.
Exit mobile version