पेरा मासेमारीतून हक्काचा उदरनिर्वाह

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
पावसाळा सुरू झाल्याने मुरूड तालुक्यातील मासेमारी नौका किनार्‍यावर ओढून शाकारण्यात आल्या असून, नौकांची डागडुजी आणि जाळी दुरुस्तीची कामे मच्छिमारांनी सुरू केली आहेत. समुद्रात मासेमारी बंद असल्याने मुरूडच्या किनार्‍यावर उथळ समुद्रकिनार्‍यावर ‘पेरा’ ही पारंपरिक मासेमारी केली जात आहे. पावसाळ्यात ही मासेमारी कोळी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन ठरत आहे.
तालुक्यातील बोर्ली, मजगाव, कोर्लई, एकदरा, येथील मोठी मासेमारी बंद असून, खाडीतील पारंपरिक मासेमारीवर मदार अबलंबून आहे. पावसाळ्यात मच्छिमारांना खूपच आर्थिक व अन्य अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर मात करण्यासाठी अलिबाग, मुरूड, नागाव, रेवदंडा, श्रीवर्धन, हर्णे आदी समुद्र किनारपट्टीवर पेरा मासेमारी केली जाते, अशी माहिती रायगड मच्छिमार कृती संघाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली.
खाडीत अशी पेरा मासेमारी करणे शक्य नसते. सरळ समुद्रकिनारी उथळ समुद्रात हात पेर्‍याने 10 ते 12 युवक नायलॉन जाळी घेऊन 100 फूट जाळीला दोन्ही बाजूला मजबूत काठी बांधून समुद्रात जाऊन ओढत जाळी किनार्‍यावर आणतात. यामध्ये खडक पालू, जिताडा, खेकडे, बोईट, तांब, मुर्दी आदी मासळी मिळते. याबाबत बोलताना मुरूड कोळी समाजाचे अध्यक्ष मनोहर बैले, यांनी सांगितले की, पेरा मासेमारी एक कष्टप्रद काम असून, ही मासेमारी 3 ते 4 तास सुरू राहते. यामध्ये तरुण युवकांचा सहभाग असून, जी मासळी मिळते, ती त्यातीलच एक तरुण बाजारात विक्रीकरिता घेऊन जातो. संध्याकाळपर्यंत मासेमारी करून मिळणारे पैशांची वाटणी करून सर्वांना दिले जातात. यामध्ये ज्याचे मालकीची जाळी असते, त्याला पैशाच्या दोन वाटण्या दिल्या जातात. समुद्राला भरती किंवा ओहटी अशा दोन्ही वेळेला पेरा मासेमारी केली जाऊ शकते. मुरूडच्या बंदर मार्गावरून जाताना अशी मासेमारी करताना कोळी युवक दिसून येतात. ही मासळी अत्यंत ताजी आणि चविष्ट असते; मात्र यामध्ये पापलेट, रावस, सुरमई यासारखी मोठी मासळी मिळत नाही.

मासेमारीचे प्रकार
कोकणात रापण, शेंडी, येंड, कांडाळी, वाऊ, डोली, गळ असे विविध पारंपरिक मासेमारीचे प्रकार असून, त्यातीलच पेरा हा प्रकार आहे. रायगडात समुद्र किनारपट्टीत बोक्षी, घोलवा, पाग डोल टाइप, पेरा अशी पावसाळ्यात मासेमारी केली जाते. उदरनिर्वाहासाठी अशा मासेमारीचा उपयोग होतो.

पावसाळ्यात जवळा, कोलंबी, शिंगटी, कालवे, बोईट, खेकडे अशी छोटी मासळी कधी कधी उपलब्ध होते. मात्र, ही छोटी मासळी ताजी असते. बर्फाचा संपर्क कुठेच नसल्याने ही मासळी अत्यंत चविष्ट लागते.

– मनोहर बैले

Exit mobile version