‘या’ तालुक्याला पुराचा धोका वाढला

?

मातीचे भराव, इमारतींच्या बांधकामामुळे
महाडला पुराचा धोका वाढला

महाड | प्रतिनिधी |
महाड शहराला पुराच्या पाण्याचा धोका जरी कायमस्वरुपामध्ये असला तरी गेल्या काही वर्षात शहरांमधील बेसुमार बांधकामे आणि अवैध मातीच्या भरावांमुळे पुराच्या पाण्याच्या धोक्यामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर भौगोलिक परिस्थितीवरुन जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला वसलेल्या महाड शहराच्या सभोवताली सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत, तालुक्याची जीवनदायी असलेल्या सावित्री नदी आणि तिच्या चार उपनद्यांना दरवर्षी येणार्‍या महापुरामुळे महाडकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. राज्य शासनातर्फे पंधरा वर्षांपूर्वी पूर प्रतिबंध आराखडा सादर करण्यात आला आहे; परंतु या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महाडकर नागरिक करीत आहेत.

महाड हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण असून, महाबळेश्‍वरमध्ये उगम पावणार्‍या कृष्णादी पाच सरिता भगिनीपैकी आपल्या पश्‍चिमेकडे सत्तर किलो मीटरचा प्रवास करुन समुद्राला मिळणार्‍या सावित्री नदीच्या उत्तर काठावर महाड शहर वसलेले आहे. बाणकोटच्या खाडीला मिळणारी सावित्री नदीचे भरतीचे पाणी महाड शहरापर्यंत पोहोचते. सुमारे पन्नास-साठ वर्षांपूर्वी नदीतून भरतीच्या प्रवाहामध्ये मोठ मोठे मचवे (मालवाहू होड्या) बंदरामध्ये येत असत. कालांतराने नदी गाळाने भरल्याने बंदर बंद पडले.सावित्रीच्या गांधारी, काळ, नागेश्‍वरी नद्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होतो. गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षे या शहरामध्ये दरवर्षी पुराचे पाणी शिरत असल्याची सरकारी दप्तरी नोंद आहे. आजच्या पिढीला माहीत असलेला सन 2005 चा प्रलयंकारी महापूर असून, या पुरामुळे तालुक्यामध्ये प्रचंड हानी झाली. गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये बांधण्यात आलेल्या प्रचंड इमारती आणि मातीचे भरावदेखील धोक्याचे बनले आहेत.

पालिकेकडून इमारतीचे बांधकाम करताना दिली जाणारी परवानगी कोणत्याही स्वरुपाची पाहणी न करता दिली जाते, त्याचबरोबर ज्या भागांतून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाहतो, त्या भागांमध्ये बेकायदेशीर प्रचंड मातीचे भराव करण्यांत आल्याने शहराला दिवसेंदिवस पुराचा धोका वाढत असून, याला स्थानिक प्रशासनाप्रमाणे शासनदेखील जबाबदार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने नदीचे पात्र उथळ झाले आहे. हा गाळ काढण्याची आवश्यकता आहे, तसेच शहराजवळच्या नदी पात्रांमध्ये खासगी जमिनीची बेटे असून, ती काढण्याची आवश्यकता आहे. नैसर्गिक अडथळ्यांपेक्षा मानवनिर्मित अडथळे अधिक असल्याने पुराच्या पाण्याचा धोका शहराला वाढत आहे.

आजही महाडकर नागरिक आपला पावसाळ्यामध्ये आपला जीव मुठीत घेऊन दिवस काढताना दिसतात. नगरपालिका, प्रशासनाकडून शहराला पुरापासून संरक्षण मिळावे याकरिता प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत; परंतु कोकणच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या शासनाच्या अनास्थेचे भविष्यात आणखी किती बळी जाणार आहेत, याचे उत्तर शासन देणार नाही, हे खरे.

Exit mobile version