कर्जत-मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर कळंब येथील पोश्रीनदीवरील पुलाजवळ रस्ता खचला असून वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. हि बाब प्रशासनाला समजताच त्यांनी संबंधित ठिकाणी सुरक्षाजाळी लावली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून जड वाहतूक होत असल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आजही सुरूच आहे. अशातच रस्त्याचे काम करत असताना या मार्गावरील अनेक पूल तसेच ठेवण्यात आले आहेत. नव्याने रस्ते होत असताना पूलदेखील नव्याने बांधले जाणे गरजेचे आहे. परंतु, तसेच वापरले जात आहेत. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय मागमार्गावर कळंब गावानजीक पोश्री नदीवर सन 1964-65 मध्ये पूल बांधण्यात आला होता. या पुलावरून सुरवातीच्या काळात जड वाहतूक होत नव्हती. मात्र, आता या पुलाने रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्हा जोडला जात असून अति जड वाहनांची रहदारी या रस्त्यावरून होत असते. जेएनपीटी, मुरबाड औद्योगिक क्षेत्र, खोपोली, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील माल वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. हा रस्ता चांगला तसेच जवळचा असल्याने या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक लक्षणीय आहे. तर, या पुलाचे साधे स्ट्रक्चरल ऑडिटदेखील अद्याप करण्यात आले नाही. परिणामी कर्जत तालुक्यात गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या पुलालादेखील बसला आहे.
पुलाजवळील रस्ता खचला असून खालच्या बाजूने पूर्णतः माती निघून गेली आहे. हि बाब रात्रीच्या सुमारास लक्षात आल्यावर कळंब ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर, प्रसाद बदे, हनुमान बदे, रवींद्र बदे, संतोष राऊत, गणेश मानकामे यांनी या ठिकाणी थांबत तात्काळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे प्रसंगाचे गांभीर्य ओळखत कळंब पोलीस चौकी येथील पोलीस कर्मचार्यांनी या ठिकाणी बॅरीगेट लावले.
रात्री गावातील मुलांचे फोन आले की पूल खचला आहे. जागेवर जाऊन पहिले असता पुलाला जोडणार्या रस्त्याची माती खालून पूर्णपणे वाहून गेलेली होती. तातडीने पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन यांना माहिती दिली. तेव्हा पोलीस कर्मचार्यांनी तिथे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरीगेट लावले. कळंब येथील पोश्री नदीवरचा हा पूल खूप जुना आहे. तेव्हा या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे तसेच नवीन पूल उभारावा, अशी आमची मागणी आहे.
– प्रमोद कोंडिलकर, सरपंच, कळंब
कळंब येथील पोश्री नदीवरील पुलाजवळ रस्ता खचला असल्याची माहिती मिळाली. याबाबत तेथील दुरुस्तीचे आदेश ठेकेदाराला दिलेले आहेत. मात्र, पाऊस खूप असल्याने कामात अडचणी येत आहेत. तसेच, या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटदेखील आम्ही करणार आहोत.
– संदीप पाटील, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ