| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याची डागडुजी सोमवारपासून सुरू केली जाईल, असे आश्वासन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी दिले होते. मात्र, धायतडक यांचा सोमवार फसवा ठरला असून, या रस्त्याला आश्वासनांचे डांबर लावण्याचे काम केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, बांधकाम विभाग सुस्त आणि खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त अशी अवस्था या मार्गावरील प्रवाशांची आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. धुळीचे कण नाकातोंडात जात आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. या रस्त्याची दुरुस्ती सोमवारपासून केली जाईल, असे आश्वासन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी दिले होते. मात्र, त्यांचा तो सोमवार अद्याप उजाडलेला नाही. त्यामुळे धायतडक यांच्याकडून आश्वासनांची डांबर लावण्यात आली असून, प्रत्यक्षात मात्र रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. मात्र, गेल्या चार दिवसांपासून वावेपासून रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु, या कामाबाबतही अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. खडीकरण करण्याऐवजी थेट डांबरी कारपेट लावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता फार काळ टिकणार नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, बेलकडे ते कुरुळ कॉलनी वसाहत प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता एमएसआयडीसाचा असल्याचे सांगून आपल्याकडील जबाबदारी झटक्याचे काम धायतडक यांच्याकडून करण्यात आले. बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणामुळे कुरुळ ते बेलकडे मार्गावरून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. फक्त बघ्याची भूमिका घेतली जात आहे. याच रस्त्यावर गेल्या चार दिवसांपूर्वी डांबर टाकून खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु, काही तासातच पुन्हा रस्ता उखडला. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आलेल्या रामेश्वर कंपनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.





