| सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली हे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्याची खड्ड्यांमुळे बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक नगरपंचायत लोकप्रतिनिधीच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. गणपती सण जवळ आला असल्याने ग्रामीण भागाकडे जाणारा मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. हा रस्ता तातडीने व्हावा अशी मागणी पालीतील सर्व स्तरातून होत आहे.
आठ दिवसांवर गणपती सण आल्यामुळे मुंबईतील चाकरमानी गणपती सणासाठी आपापल्या खेड्यापाड्यात याच रस्त्याने येतात. पाली हे शहर बल्लाळेश्वराचं अष्टविनायक एक स्थान असल्याने या ठिकाणी रेलचेल असते. सध्या स्थितीत सब रजिस्टर कार्यालय ते गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची भल्या मोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. गणपती मंदिराकडे जाणारा रस्त्यावरूनही प्रवास त्रासदायक होतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकदेखील संताप व्यक्त करत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. सदर निवेदन देण्यासाठी सुधागड तालुकाप्रमुख दिनेश चिले, विनेश सितापराव, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, पाली शहर प्रमुख विदेश आचार्य, विभाग प्रमुख प्रवीण ओमळे, एकनाथ हलदे, प्रशांत शितोळे, विनित क्षीरसागर, सुरज गुप्ता यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
आम्ही पाली नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांना आज निवेदन दिले आहे. त्या निवेदनात आम्ही म्हटले आहे की गणपती सणाच्या अगोदर नगरपंचायतीने निवेदनाची दखल घेऊन तात्काळ खड्डे बुजवावे अन्यथा (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) शिवसेना आंदोलन करेल.
– विदेश आचार्य, पाली शहर प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)






