भाविक, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
| पाली /बेणसे | वार्ताहर |
अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत नेहमी भाविकांची गर्दी असते. याशिवाय हे तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी पालीसह आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी येथे येतात. अशावेळी येथील बल्लाळेश्वर मंदिर ते हनुमान मंदिर दरम्यानच्या मार्गात प्रचंड वाहतूक कोंडी असते. येथेच वडेर हायस्कूल पालिवाला महाविद्यालय आहे. परिणामी वाहतूक कोंडीतून मार्ग काढतांना विद्यार्थी व भाविकांची खूप गैरसोय होते.
पालीतून इतर पर्यटक व चाकरमानी देखील दक्षिण रायगड व कोकणाकडे व पुणे मुंबईकडे जातात. परिणामी पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी होते. पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र येथील अरुंद रस्ता व अतिक्रमणे यामुळे वाहतूक सुरळीत करणे अवघड होत आहे. तर काही खासगी बसेस व अवजड डंपर यांना अरुंद रस्त्यातून मार्ग काढता येत नाही. त्यात शाळा महाविद्यालय भरतांना व सुटतांना मोठी गर्दी होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन येथून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे हनुमान मंदिर ते बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत असलेली अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पालीतील प्रवेश करणारे व बाहेर जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही ठिकाणचे अनधिकृत बांधकाम देखील हटवले आहे. बल्लाळेश्वर मंदिर ते गणेश थळे हॉटेल पर्यंतच्या रस्त्यासाठी जवळपास 82 लाखांचा निधी आला आहे. त्यामुळे रस्ता दर्जेदार व रुंद व्हायचा असेल तर ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहेत त्यांनी स्वतःहून ती हटवावी.
प्रणाली शेळके,
नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली
पालीतील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी व भाविकांना त्रास होतो. अरुंद रस्त्यामुळे अपघाताची दुर्घटना घडू शकते. शिवाय अनधिकृत अतिक्रमण, अपर्यायी आणि अवैध पार्किंग, अवजड वाहने व डंपर वाहतुकीमुळे ती अधिक जटिल होत आहे. रस्ता रुंदीकणासाठी अनधिकृत अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे.
कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली







