बिल्डर्रची मुजोरी उघड
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ – पिंपळोली-गुडवण-सुगवे-लोभेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याचा भाग तेथील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाने खोदून काढला आहे. तो रस्ता बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनवेळा निधी खर्च केला आहे. दरम्यान, सध्या त्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या करोडोंचा निधी खर्च करून कामे सुरु असताना एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ताच खोदून अन्य ठिकाणी वळविला आहे.
नेरळ- तळवडे -पिंपळोली गुडवण सुगवे लोभेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यावर असलेल्या पिंपळोली आणि काळेवाडी हद्दीमध्ये मुंबई येथील एका मोठ्या बांधकाम व्यवसायिकाने जमिनी खरेदी केल्या आहेत.2000 मध्ये या रस्त्याची निर्मिती झाली आणि त्यावेळी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून वंजारपाडा फाटा ते सुगवे या भागातील रस्ता बनविण्यात आला होता. त्यानंतर देखील या रस्त्याचाही डांबरीकरण करण्यात आले होते. तर सध्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण आदी कामे मंजूर आहेत. त्यातील बीबीएम डांबरीकरण मागील वर्षी झाले असून कार्पेट डांबरीकरणाची कामे तळवडे पासून काळेवाडी पर्यंत बाकी आहेत. तर काळेवाडी पासून लोभेवाडी पर्यंत कार्पेट डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पिंपळोली गावाच्या हद्दीत जमीन खरेदी करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाने शासनाचा रस्ता खोदून तेथे लोखंडी पत्रे उभी केली आहेत. त्यावेळी आपल्या जागेच्या बाहेर नवीन रस्ता बनवून दिला आहे.
मात्र नवीन बनवून दिलेला रस्ता हा मातीचा भराव टाकून बनविला आहे. त्यामुळे त्या मातीवर टाकलेली डांबर पावसाच्या पाण्याने निघून जाऊ लागली आहे. सरकारने काही लाख खर्चून तयार केलेला रस्ता बिल्डर स्वतःच्या आर्थिक उखडून टाकतो हे कोणत्या अधिकारात बसते असा सवाल अँथ्राट येथील ग्रामस्थ रवींद्र डायरे यांनी उपस्थित केला आहे. सदरचा रस्ता खोदण्यासाठी संबंधित बिल्डरने सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणत्याही स्वरूपात परवानगी घेतलेली नाही. त्यात रस्ता खोदला असल्याची साधी माहिती देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता निदर्शनास आले आहे. माध्यमांचे प्रतिनिधी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता आम्ही जाऊन पाहणी करतो अशी माहिती दिली आहे.