| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
पाली येथील बल्लाळेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक व भाविकांना तीव्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण उखडल्याने पालीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपंचायतीने टोल नाका बसवून बाहेरून येणाऱ्या वाहनांकडून कर वसूल केला जातो. तरीदेखील पालीत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची नागरिकांची तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर पालितील मयुर ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. कर देऊनही रस्ते आणि शुद्ध पाणी मिळत नसेल, तर नगरपंचायतीला कसला कर द्यायचा, असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, लोकांनीही यासंदर्भात आपली नाराजी नोंदवायला सुरुवात केली आहे.







