करंजा बंदराकडे जाणारी वाट बिकट

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील सर्वात मोठी लोकवस्ती असलेल्या करंजा बंदर ते उरण या मार्गाची दुरवस्था झाली असून, या रस्त्याची वाट बिकट बनली आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 7) या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आधीच पाण्यासाठी वणवण सुरू असताना येथील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याबरोबरच रस्त्याच्या नागरी सुविधेची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

उरण तालुक्यातील करंजा बंदर हे महत्त्वाचे बंदर आहे. या परिसरातील कोळी, आगरी, कराडी बांधव मोठ्या प्रमाणात या बंदराचा वापर मासेमारीसाठी, आपल्या बोटी समुद्रात नांगरुन ठेवण्यासाठी करीत आहेत. तसेच अलिबाग व मुंबई शहराला जोडणारे महत्त्वाचे बंदर असणारे बंदर असल्याने या बंदराचा वापर चाकरमानी, दरदिवशी प्रवास करणारे नोकरदार प्रवासी नागरिक करीत आहेत. परंतु, करंजा बंदर-उरण चार फाटा या रस्त्याची, साईडपट्ट्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्यात शनिवारी संध्याकाळपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने प्रवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तरी, या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version