| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील मांगवली आदिवासी वाडीतील स्मशानभूमीचा रस्ता अखेर मोकळा झाला आहे. छत्रपती महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा या उपक्रमात शासनाने आदिवासी बांधवांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबविले असून याचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे.
माणगाव येथील मांगवली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी केवळ पायवाट होती. मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दूरवरच्या आणि कठीण पायवाटेने जावे लागत असल्याने ग्रामस्थांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाच्या नवीन धोरणांतर्गत या पायवाटेला विकास कार्यक्रमात समाविष्ट करून रस्ता मोठा करून खुला करण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते फित कापून तर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, माणगाव तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार विपुल ढुमे, अर्जुन जमखंडी, गणेश विटेकर, प्रियांका सत्तेरे, शुभांगी कमलाकर, प्रतीक्षा डामसे, सुवर्णा सकपाळ, मंगेश पवार, माई पवार, आदेश तेटगुरे, बाबू पाखुर्डे तसेच स्थानिक अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







