फार्म हाऊसच्या मालकांच्या सोयीसाठी रस्ता वळविला

खांडपोली ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

। पाली । प्रतिनिधी ।

पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत भेरव आवंढे खांडपोली ते कामथेकरवाडी अशी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. भेरव आवंढे खांडपोली हा आधीपासूनच रायगड जिल्हा परिषदेचा डांबरी रस्ता असून त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर कुठेही डांबर राहिले नसून माती व दगड शिल्लक राहिले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता नव्याने बांधण्यात येत आहे.

खांडपोली हे पूर्वीपासून महसुली गाव आहे. गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, पंचायतीचे व वनविभागाचे कार्यालय आहे. परंतु, काही ठराविक अधिकार्‍यांना हाताशी धरून कामथेकर वाडीच्या रस्त्याला लागून असलेल्या दहा पंधरा फार्महाउस मालकांनी त्यांच्या सोयीसाठी हा रस्ता आवंढे फाट्यावरून तोडून कामथेकर वाडीकडे वळविला असून याच्या विरोधात ग्रामस्थ खांडपोली गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेचा मूळ रस्ता भेरव आवंढे खांडपोली हा जवळपास साडेपाच किलोमीटर अंतराचा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. दिल्लीवरूनही या रस्त्याला मंजुरी मिळून त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली. भेरव आवंढे खांडपोली हा नियमात बसणारा रस्ता असतानाही कामथेकर वाडीच्या फाट्यावर खांडपोलीकडे जाणार्‍या रस्त्याला कट करून काही ठराविक फार्म हाऊसच्या मालकांसाठी तो थेट कामथेकर वाडीकडे वळविण्यात आला असल्याने खांडपोलीकडे जाणारा जवळपास दीड पावणेदोन किलोमीटरच्या रस्त्याला कोणत्या नियमानुसार कट करण्यात आला, असा सवाल खांडपोली ग्रामस्थ करीत आहेत. खांडपोली ग्रामस्थांचे एक शिष्ट मंडळ महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था पुणे या योजनेचे मुख्य अभियंतामाने यांची भेट घेऊन खांडपोली गावाची फसवणूक करून चुकीच्या मार्गाने केवळ फार्म हाऊस मालकांच्या सोयीसाठी हा रस्ता कामथेकर वाडीकडे वळविला जात आहे हे निदर्शनास आणून दिले.

वास्तविकता भैरव आवंढे खांडपोली असा सरळ असताना त्याचे तुकडे कोणी केले? रस्त्याचा सर्वे होत असताना खांडपोली ग्रामस्थांपैकी पंचनाम्यासाठी एकाही नागरिकाला का घेतले नाही? खांडपोलीकडे जाणारा रस्ता अत्यंत दैनावस्थेत असतानासुद्धा तो रस्ता मध्येच का कापला, असा सवाल खांडपोली ग्रामस्थ करीत आहेत. खांडपोली या महसूल गावालाच बगल दिल्याने केवळ फार्म हाऊस मालकांच्या सोयीसाठी हा रस्ता बनविला जात असेल आणि खांडपोली गावाकडे हा जर रस्ता होत नसेल तर खांडपोलीचे ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ अनिल वाणी, संतोष डाके, वैभव खानेकर, विजय वाघमारे, रवींद्र घोलिपकर, संकेत इंदुलकर, योगेश इंदुलकर यांनी दिला आहे.

Exit mobile version