अतिवृष्टीत रस्ता गेला वाहून

शेतकरी संघटनेचा रस्ता रोको करण्याचा इशारा

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील आरवघरसह पाच गावांना जोडणारी रस्त्यावरील मोरी अतिवृष्टीत पुराच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेली असून, केवळ दुचाकी जाईल एवढाच रस्ता शिल्लक राहिल्याने ग्रामस्थांची अडचण होत आहे. आरवघर भागाला पाच गावे जोडलेली असून, दुचाकीव्यतिरिक्त चारचाकी वाहन या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत गावाला पाणी देण्यासाठी रस्त्याच्या बाजूला चर खणण्यात आले. परंतु, पाईपलाईन खड्ड्यात बुजवताना ती वरवर माती टाकून बुजविल्यामुळे अतिवृष्टीमुळे सर्व माती वाहून जाऊन मोठ मोठे खड्डे आहेत. दरम्यान, रस्त्याच्यामधून पाणी जाण्यासाठी काँक्रिटचे मोठे पाईपसुद्धा वाहून गेले आहेत. रस्त्याची मोरीच वाहून गेल्याने रस्ता पोकळ बनला आहे. त्यामुळे येथून चारचाकी वाहन जाणे अशक्य बनले आहे. संबंधित खात्याला कळवूनसुद्धा लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र राज्य किसान क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत जंजीरकर यांनी सांगितले की, अतिवृष्टी झाल्याने ही मोरी वाहून गेली. त्याचप्रमाणे काही शेतकर्‍यांच्या शेतात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी खात्याने तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, तसेच आरवघर येथील मोरी तातडीने दुरुस्त करून वाहतूक कशी सुरळीत होईल हे प्रशासनाने पाहावे अन्यथा सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, मोरी तुटल्याने घानवट, वेळास्ते, पोफळी, वावे व वांद्रे या गावच्या ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. भातलावणीचा हंगाम असल्याने बैलगाडी, टेम्पो, ऑटो रिक्षा आदी वाहनांतून खते व अन्य वस्तुंची वाहतूक बंद झाली असून, शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे. कालपर्यंत प्रशासनाचे कोणीही अधिकारी इकडे फिरकले नसल्याने ही मोरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कधी दुरुस्त करेल, या विवंचनेत ग्रामस्थ पडले आहेत. मोरीचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक पुर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच शेतकरी एक होऊन मोठे रास्ता रोको आंदोलन होण्याची दाट शक्यता येथे निर्माण झाली आहे.

Exit mobile version