माथेरानचे रस्ते चकाचक

क्ले पेव्हर ब्लॉकमुळे व्यापारी वर्गात समाधान
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये धूळ विरहित रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा याकामी सनियंत्रण समितीच्या परवानगीने एमएमआरडीएच्या माध्यमातून क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे सध्यातरी युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे नेहमी लाल मातीत न्हाऊन निघालेल्या माथेरान आता चकाचक दिसू लागले आहे. शहरातील मुख्य रस्ता असणार्‍या महात्मा गांधी व्यापारी, दुकानदार तसेच लहान मोठे रेस्टॉरंट खाद्यगृहे, स्टोल धारकांची असंख्य दुकाने आहेत.या मार्गावर सततची रहदारी असल्यामुळे येथील मातीच्या रस्त्यातून चालताना पर्यटकांसह नागरिकांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याच धुळीमुळे व्यापारी वर्गाच्या दुकानातील मालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असे.

परंतु या धूळ विरहित रस्त्यांसाठी क्ले पेव्हर ब्लॉकचा एकमेव उपाय समितीने सांगितल्यावर याठिकाणी एमएमआरडीए च्या माध्यमातून माथेरानचे प्रवेशद्वार असणार्‍या दस्तुरी नाक्यापासून ते पांडे रोड पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज रोड येथील रहिवाशांच्या मागणीनुसार वन ट्री हिल विभागापर्यंत क्ले पेव्हर रस्ते तयार करण्यात येणार आहेत .त्यामुळेच सद्यस्थितीत ही कामे वेगाने सुरू केली आहेत. माथेरानच्या विकास कामांसाठी माजी नगराध्यक्ष अजय सावंत मागणीनुसार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास 123 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळेच सर्व महत्वाची कामे पूर्ण केली जात आहेत.

नौरोजी उद्यानापर्यंत क्ले पेव्हर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे पुढील कामे पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए ठेकेदार सुध्दा तितक्याच जोमाने कार्यरत दिसत आहे. त्यामुळेच व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केले आहे. पर्यटक सुध्दा या रस्त्यावरून चालण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. सायंकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. पर्यटक सामानाच्या बॅगा सुध्दा अगदी सहजपणे खेचून नेताना दिसत आहेत.

माथेरानला धुळविरहित रस्त्यांचे काम चालू आहे त्यामुळे व्यापारी , स्थानिक बरोबर पर्यटक सुद्धा आनंदीत आहोत.व्यापार्‍यांना होणार्‍या धुळीच्या दुष्परिणामा पासून मुक्तता मिळणार या आम्ही सर्वजण आहोत.लाल मातीतील धुळीच्या रस्त्यावर लिद असल्या कारणाने आरोग्याच्या अनेक आजारास सामोरे जावे लागत आहे. तसेच या धुळीने विक्रीच्या मालाची सुद्धा हानी होत असते. – ज्ञानेश्‍वर बागडे, व्यापारी माथेरान

Exit mobile version