| रोहा | प्रतिनिधी |
रोहा-अष्टमी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडल्या. या निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता रोहा नगर पालिकेच्या ज्येष्ठ नागरिक शहर सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून, मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात विशेष बैठक पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी पुंडलिक मोकल, नायब तहसीलदार राजेश थोरे, नायब तहसीलदार वैशाली काकडे, निवास पाटील, स्वप्नील तोंडणकर तसेच मतमोजणी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु केली जाईल. मतमोजणी सुरु होण्यापूर्वी सदर मतमोजणी केंद्रात संबधित उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. प्रत्येक वेळी 2 प्रभागातील मतमोजणी होणार असून, मतमोजणीच्या एकूण 5 फेऱ्या होणार आहेत. सर्व मतमोजणी प्रक्रियेसाठी 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.







