। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा ग्रामीण भागात जंगल परिसरात गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रोहा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उप अधीक्षक रवींद्र दौडंकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे.
रोहा तालुक्यातील जंगल भागातील खडकी गावाजवळील जंगल भागात गुरुवारी (दि.21) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास धाड टाकून ही कामगिरी केली. या धडक कारवाईत पोलिसांना गावठी हातभट्टी दारूसाठी लागणारे 60 लिटर तयार दारूचे 3 प्लास्टिकचे ड्रम, 6 निळ्या रंगाचे नवसागर मिश्रित रसायने भरलेले पिंप असे एकूण 91, 200 रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करुन कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी राजेंद्र कोंडार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी मिथुन काशिनाथ हिरवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणासुदीच्या पार्श्ववभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गावठी दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.





