कुमुदिनी चव्हाण यांचे गौरवोद्गार
| नाते | वार्ताहर |
रायगड जिल्हा संघर्ष असोसिएशनने आयोजित केलेला आदर्श माता पुरस्कार सोहळा हे देवालय असून या पुरस्कार सोहळ्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेविका व मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या संस्थापक- अध्यक्षा कुमुदिनी चव्हाण यांनी काढले.
रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनच्या वतीने महाड तालुक्यातील लाडवली येथे आदर्श माता पुरस्कार सोहळा व विविध क्षेत्रातील गुणीजणांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होत्या. या वेळी विशेष अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज काळीजकर, ज्येष्ठ नागरिक अ. वि.जंगम आदी उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कौतुक करताना कुमुदिनी चव्हाण पुढे म्हणाल्या, वर्षपूर्ती निरोपाची आणि नववर्षांच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला जातात. पण रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा म्हणजे यातून ऊर्जा घ्यावी असाच आहे. रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, अशा शब्दांत पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव केला.
आदर्श माता पुरस्काराचे वर्णन करताना त्यांनी हा सर्वात मोठा पुरस्कार असून मुलाच्या नावाने जेंव्हा आई वडिलांना ओळखले जाते तेंव्हा ऊर भरून येतो. ज्या आईला हा पुरस्कार मिळाला तिचा आनंद गगनात मावेनासारखाच आहे. कारण या पुरस्कारापेक्षा कोणताच पुरस्कार मोठा नाही. या आई खरोखरच भाग्यवंत आहेत, असे गौरवोद्गार सौ. कुमुदिनी चव्हाण यांनी काढले. जी आई मुलांना चांगले संस्कार देते तिचाच गौरव होतो. आईसारखे सर्वश्रेष्ठ दैवत जगात दुसरे कोणतेच नाही, असे त्या म्हणाल्या.
आशा उमरटकर, संगीता बारगजे, साक्षी थळे, शारदा जाधव, पुष्पा मुंगसे या महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन कुमुदिनी चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भारती रमेश चोरट ( पाटील) यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पळचिल येथील कीर्तनकार शशिकांत गंगाराम जाधव यांना उत्कृष्ट कीर्तनकार म्हणुन गौरवण्यात आले. तसेच महमदअली चिपळूणकर, संजय म्हस्के, उमेश मिंडे यांना आदर्श उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कदम यांना दुर्गप्रेमी पुरस्कार तर महाड येथील एकांत दीपक गुंजवटे याला आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.