| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांनी देशाला स्वतंत्र मिळावे यासाठी बलिदान दिले. घटना कर्जत तालुक्याला अभिमान वाटावी अशी असून, कर्जत तालुक्यात हुतात्मा स्मारक समितीकडून इतिहासाचे स्मरण करण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या हुतात्म्यांची माहिती व्हावी यासाठी सुरु असलेले कार्य आणि प्रसार प्रचार करण्याची भूमिका महत्त्वाची आहे, असे कौतुक कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. भजनभूषण स्व. गजाननबुवा पाटील आणि गीतकार अनंत पाटील यांना हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या 82व्या स्मृतिदिनानिमित्त नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. कल्याण कर्जत रस्त्यावरील हुतात्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे,माजी आमदार सुरेश लाड,रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे,निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत,पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे,माजी सभापती अमर मिसाळ,नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर,माजी उप सरपंच मंगेश म्हसकर,निवृत्त जवान कुमार जाधव,किरण कांबरी,अर्जुन शिंदे,चित्रकार पराग बोराडे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामचंद्र ब्रम्हांडे,शरद भगत यांच्यासह सायकल पटू हिरेन हिसालके,हुतात्मा गौरव पुरस्कारकर्ते भजन भूषण गजाननबुवा पाटील आणि गीतकार अनंत पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ते भजनभूषण गजाननबुवा पाटील यांचा हुतात्मा गौरव पुरस्कार त्यांचे कुटुंबीय प्रसाद पाटील, सुचिता वांजळे आणि संगीता पाटील यांनी मरणोत्तर हा पुरस्कार स्वीकारला. तर गीतकार अनंत पाटील यांच्या कन्या छाया पाटील तसेच अन्य दोन्ही कन्या आणि जावई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तर निवृत्त जवान आणि सर्व शाळांचा हुतात्मा भिडू कोतवाल आणि हिराजी पाटील यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सामरिक समितीचे विजय मांडे,किशोर गायकवाड,अरुण बैकर, ॲड. जगदीश कराळे, महेश भगत, बंटी शिर्के, नितीन पारधी, हेमंत कोंडिलकर, मनोहर हजारे, सुभाष नाईक आणि अनंत भोईर यांनी केले.