मुसळधार! वादळी वार्‍याने घराचे छप्पर कोसळले

। दिघी । गणेश प्रभाळे ।
श्रीवर्धन तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. दिवसभर वादळी वार्‍याच्या पावसाने अनेक ठिकाणी पडझडी झाल्या. तर मंगळवारी (दि.9) पहाटे बोर्लीपंचतन येथे घराचे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. बोर्लीपंचतन येथील रहिवासी सुनील दत्तात्रय भाटकर यांनी त्यांच्या राहत्या घरात व्यवसायासाठी लागणारे तसेच संसारोपयोगी वस्तूंची सामुग्री ठेवली होती. वादळी पावसाळ्यातच घरातील छप्पर पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

मंगळवारी पहाटे मध्यरात्री सोसाट्याच्या वार्‍यासह कोसळणार्‍या पावसाने राहत्या घराचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. तात्काळ घटनास्थळी भेट देवून बोर्लीपंचतन तलाठी दत्तात्रय कर्चे यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.

गेले काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला. सलग चौथ्या दिवशी मंगळवारी पावसाने उग्ररूप धारण करीत धुवाँधार कोसळणे सुरूच ठेवले आहे. या वादळामुळे विद्युत पुरवठा दिवसरात्र खंडीत होत आहे. यापुर्वी तालुक्याला चर्कीवादळाचा फटका बसून अनेक कुटुंब उद्वस्त झाली होती.

काल रात्री घटलेल्या घटनेत भाटकर यांचे भाड्याने देण्यात येणारे मंडप साहित्य तसेच घरात वापरण्यात येणार्‍या अनेक वस्तू पाण्यामुळे खराब झाल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version