पंचनाम्याला मुदतीचे बंधन नको; शरद पवारांच्या राज्य सरकारला पाच सूचना
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे, तर अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारला राज्यातील पूरग्रस्तांना कशाप्रकारे मदत करावी, याबाबत आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रविवारी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या आणि मदतीच्या स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या. आता शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला पाच प्रमुख सूचना केल्या आहेत. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो. या संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे. जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांनी केलेल्या सूचना
पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचे बंधन नसावे.
नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे.
साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा.
शेतकरी हिताचे निर्णय.
मानसिक व सामाजिक आधार.
