गौरी पुजनासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीची लगबग
| अलिबाग | प्रतिनिधी |
दीड दिवसाच्या विसर्जनानंतर गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन घरोघरी होणार आहे. जिल्ह्यात 14 हजार 455 ठिकाणी गौरीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. काही ठिकाणी मुर्ती, काही ठिकाणी मुखवटा तर काही ठिकाणी चित्र बसवून प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये आदल्या दिवशी बुधवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
दीड दिवसाच्या गणेशमुर्तीच्या विसर्जनानंतर गुरुवारी गौरी घरोघरी विराजमान होणार आहे. त्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गौरी पुजनासाठी लागणारे साहित्य, नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्या व सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. गौरीचे स्वागत व सजावट जल्लोषात व्हावे यासाठी महिला वर्ग तयारीला जोमाने लागल्या आहेत. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या गौरींची मुखवटे, चित्र तसेच मुर्तीकारांकडे गौरीची मुर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी प्रचंड गर्दी असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यामध्ये 14 हजार 455 ठिकाणी गौरीची मुर्ती, मुखवटा व चित्राची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. वाजत गाजत गौरीचे स्वागत केले जाणार आहे. सकाळपासूनच त्याची तयारी सुरु केली जाणार आहे. गौरीचे पारंपारिक पध्दतीने पुजन केले जाणार आहे. त्यानंतर आरती केली जाणार आहे. नव्याने घरी आलेल्या गौरीला भाजी भाकरीचे नैवेद दिले जाणार आहे. रात्रभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जागरण केला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुपामध्ये वेगवेगळी फळे, नैवेद्य, गोड पदार्थ ठेवून सुवासिनींद्वारे गौरीला नैवेद्य दाखविले जाणार आहे.