नवी मुंबईकरांची सुरक्षा हीच प्राथमिकता

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केले. त्याशिवाय पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे त्यांनी संकेत दिले.

21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबई शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अशातच नवी मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तपदी मिलिंद भारंबे रुजू झाले आहेत. 1998 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले मिलिंद भारंबे यांनी आपल्या अडीच दशकाच्या कारकिर्दीत मिळालेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. अत्यंत मितभाषी असलेले भारंबे यांना पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उद्भवणार्‍या विविध समस्या सोडवण्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलाला त्यांच्या अनुभवाचा निश्‍चितच फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

सायबर गुह्यांचे मुख्य आव्हान
सायबर गुन्हे उघडकीस आणणे मोठे आव्हान असून सायबर गुन्हेगारांची राजस्थान, हरियाना, बिहार, झारखंड, यूपी, ओरिसा या राज्यात गावेच्या गावे आहेत. यातील अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. त्या भागात जाऊन सायबर गुन्हेगारांना पकडणे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे सायबर क्राईम खूप महत्त्वाचा विषय असून या गुह्यांचा तपास करण्याबरोबरच अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहे.

पोलिसांवरील विश्‍वास दृढ करणार
सध्या सर्व प्रकारच्या गुह्यांचा आढावा घेण्यात येत असून कोणत्या प्रकारच्या गुह्यांना आळा घालण्यासाठी काही करता येऊ शकते का? तसेच त्यात आणखी काही सुधारणा करता येऊ शकते का? याचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानंतर विशेष उपाययोजना करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबरोबरच पोलिस कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवून सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांवरील विश्‍वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Exit mobile version