मिठेखारच्या ग्रामस्थांची सुरक्षा वाऱ्यावर

आमदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्दैवी घटना

| अलिबाग | प्रतिनिधी |

गेल्या सात वर्षापासून मिठेखार गावातील संरक्षक भिंतीचा प्रस्ताव लालफितीत अडकून राहिला आहे. डोंगरालगत असलेल्या गावांच्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्यास प्रशासन उदासीन ठरले. आमदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या निष्काळजीपणामुळे मिठेखार येथील वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

कालपासून सुरु असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. मुरुड तालुक्यातील मिठेखार येथील वयोवृद्ध महिला विठा मोतीराम गायकर (75) या त्यांच्या घरात होत्या. घराच्या मागे काहीतरी आवाज आल्यावर त्या पहाण्यास गेल्या. त्यावेळी अचानक माती दगडाचा ढिगारा कोसळून खाली आला. दरड कोसळल्याने विठा गायकर यांना गंभीर दुखापत होऊन त्या जागीच मृत पावल्या. सर्वांची धावाधाव सुरु झाली. आक्रोश, शोकाकूळ वातावरण, त्यात दरडीमुळे भयभीत गाव असताना प्रशासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्काळजीपणाची प्रचंड चीड अनेकांमध्ये होती. या दुर्देवी घटनेची माहिती शेकाप प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे गटातील बोर्लीतील नेत्या राजश्री मिसाळ, शेकापचे विक्रांत वार्डे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा संताप चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. प्रशासन आणि सत्ताधारी काय करतात, असा सवाल उपस्थित केला. मिठेखार येथे 60 घरे असून 250 हून अधिक नागरिक राहत आहेत. डोंगराच्या बाजूला असलेल्या या गावाच्या व ग्रामस्थाच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने संरक्षिक भिंत बांधण्याचे आश्वासन देऊन काम मंजूर केले होते. परंतू गेली अनेक वर्ष उलटूनही संरक्षक भिंत बांधण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचा प्रस्ताव कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रशासन आणि आमदारांच्या भूमिकेबाबत नाराजी
मिठेखार येथे संरक्षक भिंत निर्माण व्हावी, यासाठी विद्यमान आमदार दळवी यांनी प्रयत्न केले. गेल्या सहा वर्षापासून सत्तेत असताना मिठेखारच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे दरड कोसळून मिठेखारमधील वयोवृद्ध महिलेचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. गावात मृत्यूचा आक्रोश असताना, विद्यमान आमदारांच्या पत्नी मानसी दळवी यांनी राजकीय तमाशा केला. राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र ग्रामस्थांनी धारेवर धरत तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही, असे म्हणत प्रशासन आणि आमदारांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाचा निष्काळजीपणा
प्रशासनाने संरक्षक भिंत यापूर्वी बांधली असती तर दरड कोसळून दुर्दैवी घटना घडली नसती. अशी प्रतिक्रया उमटत आहे . प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका मिठेखार गावाला बसला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Exit mobile version