सांदोशी-बौद्धवाडी रस्ता गेला वाहून; हिरकणी वाडीमध्ये घर जमीनदोस्त

। महाड । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेला सांदोशी ते बौद्धवाडी हा रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेला तर हिरकणी वाडीमध्ये एक घर पूर्ण जमीनदोस्त झाले. या दोन घटनांप्रमाणे या परिसरात अन्यदेखील नुकसान झाले असून रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे.

महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या सांदोशी गावाकडे जाणारा रस्ता पावसाळ्यामध्ये पूर्ण नादुरुस्त झाल्याने या मार्गावर प्रवासी वाहतूक तुरळक झाली आहे. सांदोशीकडे जाणारा रस्ता हा पाचाड गावातून जातो. बांधणीचा माळ या ठिकाणाहून एक रस्ता सांदोशीकडे तर दुसरा रस्ता आमडोशी गावाकडे जातो. दोन्ही गावाकडे जाणारे रस्ते मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे बांधण्याच्या माळापर्यंत वाहने जाणे शक्य आहे. मात्र त्यापुढे पाच ते आठ किलोमीटर ग्रामस्थांना चालत जावे लागत आहे.

सांदोशी गाव हे रायगडच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसले असून धरण क्षेत्रामध्ये आल्याने या गावाचा विकास थांबला आहे. भविष्यात सांदोशी गाव अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. या गावापासून जवळच असलेल्या बौद्ध वाडीकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेला असल्याने बौद्ध वाडीचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.

या परिसरातून पाचाड आणि कोंझर शाळेमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. या परिसरात प्रवासी बस सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळे शासनाने रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी सांदोशीचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी केली. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन सांदोशी बौद्ध वाडी रस्त्याचे काम रायगड जिल्हा बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

भर पावसात संसार उध्वस्त
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथील रायबा भागोजी अवकीरकर या गरीब शेतकर्‍याचे अतिवृष्टीमुळे राहते घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले आह. घर कोसळल्याने रायबा अवकीरकर निराधार झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी हिरकणी वाडीतील माजी सरपंच राजेंद्र खातू, रघुवीर देशमुख, लहू अवकीरकर, गणेश अवकीरकर आदी ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version