| पनवेल | प्रतिनिधी |
दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित ‘संक्रांत मेळावा 2026′ हा कार्यक्रम कामोठे येथे पार पडला. महिलांच्या सन्मानासाठी, आत्मसन्मानासाठी व सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला कामोठ्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासह ॲड. रोहिणी साळे, डॉ. गणेश साळे, आमदार पत्नी मोहिनी पाटील, नगरसेविका स्नेहल ढमाले, नगरसेविका हेमलता गोवारी, नगरसेविका शिला भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला साई द्वारका हॉस्पिटलचे डॉ. हेमंत पाटील व समाजसेविका इंदू झा यांच्यासह जयश्री राठोड, राजश्री थोरात, शुभांगी पाटील, जयदादा युवा मंचचे संस्थापक जय डिगोळे, एल.एम. इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या संस्थापिका ललिता कनोजिया, विभावरी शिगवन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल डांगे यांनी केले. तसेच मनीषा मोरे, वंदना पोपळकर, दीक्षा ढोणे, गीता कुडाळकर, वंदना वाघमोडे, करुणा कांबळे, शिल्पा म्हात्रे व संपूर्ण टीम यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
यावेळी ॲड. रोहिणी साळे यांनी, भविष्यात महिलांसाठी आरोग्य शिबीरे व विविध समाजोपयोगी उपक्रम दिशा महिला मंचसोबत संयुक्तपणे राबवण्यात येतील, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ, विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे विधवा महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभ राबविण्यात आला. या संवेदनशील उपक्रमामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आत्मीयतेचा आनंद दिसून आला. यावेळी प्रमुख पाहुण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी महिलांना स्वतःची काळजी, सुरक्षितता, आत्मभान आणि मानसिक सबलता याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी दिशा महिला मंचच्या उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले. संस्थेच्या संस्थापक नीलम आंधळे यांनी, स्त्रीशक्तीच्या सन्मानासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा महिला मंच नेहमीच कार्यरत राहील, असे सांगितले.
या कार्यक्रमात महिलांनी पैठणी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी महिलांना केसगळतीवर उपाय म्हणून आयुर्वेदिक हेअर ऑइल वाण स्वरूपात देण्यात आले. शुभांगी कलेक्शनकडून महिलांना आकर्षक गिफ्ट देण्यात आले. तसेच, महिलांना विविध ठिकाणच्या पिकनिक पॅकेजेसवर विशेष सवलती देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी सर्व मान्यवरांचे, प्रायोजकांचे, सहकार्य करणाऱ्या संस्था, टीम व उपस्थित महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.







