शालेय साहित्य विक्री करणार्या व्यपार्यांना सुगीचे दिवस
दप्तर, गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची झुंबड
सुधागड-पाली | वार्ताहर |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांनंतर इयत्ता पाचवीपासून पुढील वर्गांच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. यामुळे जिल्ह्यात शाळांवर अवलंबून असलेले दप्तर, गणवेश, शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यावसायिक व दुकानदारांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.
पालीतील स्टेशनरी विक्रेते प्रल्हाद खाडे यांनी सांगितले की, तब्बल दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने वही, पेन, पेन्सिल, पुस्तके, दप्तर, कंपास आदी शैक्षणिक साहित्याची विक्री पूर्णवेळ ठप्प होती. मात्र, शाळा सुरू होणार जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची या वस्तू खरेदीची लगबग सुरू आहे. त्यामुळे नवीन मालदेखील मागविला आहे. तर सलीम शेख या टेलरने सांगितले, की अनेकजण गणवेश शिवण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे इतके दिवस संथगतीने सुरू असलेल्या व्यवसायाला गती मिळाली आहे. येथील एका चप्पल विक्रेत्या दुकानदाराने सांगितले, की मुले शाळा सुरू होणार म्हणून नवीन शूज, सँडल व चप्पल खरेदी करत आहेत. महाड येथील पालक अजय जाधव म्हणाले, की मागील वर्षी नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच झाल्या नसल्याने गणवेश, दप्तर, शूज, कंपास असे कोणतेच शैक्षणिक साहित्य घेतले नव्हते. मात्र आता मुलांची शाळा सुरू होत आहे. त्यामुळे हे आवश्यक समान खरेदी केले आहे.
शाळा सुरू होणार असल्याने नवीन शैक्षणिक साहित्य, गणवेश, बूट आदी आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक व दुकानदारांचा धंदा चांगला होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसुद्धा घेतली जात आहे. अनेकांनी अधिकचा माल मागवला आहे.
प्रशांत खैरे, उपाध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, पाली
शाळा सुरू होणार म्हणून खूप आंनद होत आहे. तसेच मित्रमैत्रिणी भेटणार, शिवाय नवीन दप्तर, शूज, साहित्य व गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे आणखीनच आनंद होत आहे.सुजल रत्नदीप वाघपंजे, विद्यार्थी, श्रीवर्धन