जिल्ह्यात शाळेची घंटा वाजली; दीड वर्षानंतर शाळेत किलबिलाट

कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आज 27 सप्टेंबर पासून शाळेची घंटा पुन्हा वाजली आहे. शाळेमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून अलिबागसह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने मुल, शिक्षक पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा प्रशासनाकडूनही कोरोना नियमांचे पालन करून मुलांना ऑफलाईन शिक्षण सुरू केले आहे.
दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा सुरूच असल्याने शाळा, महाविद्यालय ही शासनाने बंद ठेवली होती. मधल्या काळात शाळा, महाविद्यालय सुरू झाली होती. मात्र पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद झाल्या होत्या. पण आता राज्यात कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने शासनाने नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी पालकांच्या संमतीने शाळा सुरू होऊ लागल्या आहेत.
अलिबागमधील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांसह सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कुल, डिकेटी आणि जिल्ह्यातील इतर शाळा, महाविद्यालय आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेतील वर्ग सॅनिटायझर केले आहेत. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची तापमान तपासणी आणि सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे. शाळेत एका बेचवर एक विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. शाळेत एक दिवस आड विद्यार्थी येणार असून सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शाळेची घंटा दीड वर्षाने वाजल्याने मुलांमध्ये ही आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मात्र ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थी, शिक्षक यांना अडचणी येत होत्या. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले ही मोबाईलमध्येच गुंतलेली होती. त्यामुळे पालकांमध्येही नाराजी होती. मात्र शाळा पुन्हा सुरू झाल्याने पालक आणि शिक्षकही आनंदित झाले आहेत.

Exit mobile version