शाळेला पदवीधर शिक्षकाची मागणी

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भेकुर्ली येथील प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक द्या, या मागणीसाठी पालकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालय गाठले होते. मात्र, गटशिक्षणाधिकारी हे शिक्षक समायोजनसाठी ओरोस येथे गेल्याने ग्रामस्थांना निराश होऊन माघारी परतावे लागले. पुन्हा पुढील आठवड्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन नवीन शिक्षक भरतीत पदवीधर शिक्षक मिळावा, अशी मागणी करणार असल्याचे पालकांनी सांगितल आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप देसाई, ग्रामपंचायत सदस्य नीलेश देसाई यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पालकांनी सांगितले की, भेकुर्ली गाव हा दुर्गम भागात येतो. त्यामुळे येथील मुलांना शालेय शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळा हेच माध्यम आहे. भेकुर्ली शाळेत सात वर्ग आणि एक शिक्षण सेवक आहे. शिक्षण सेवकांना प्रशिक्षण तसेच कार्यालयीन कामे असतात. त्यामुळे दुसरा शिक्षक आवश्यक आहे. या ठिकाणी पदवीधर शिक्षक जागा रिक्त आहे. शिवाय येत्या काही दिवसांत शिक्षक भरती होणार आहे. ते पाहता भेकुर्ली शाळेला पदवीधर शिक्षक मिळावा. तसेच, पटसंख्येची अट न ठेवता दुर्गम हा निकष ठेवावा, अशी आमची मागणी आहे.

Exit mobile version