। मुंबई । प्रतिनिधी ।
करोनाच्या ओमिक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे राज्यातील प्राथमिक शाळा बुधवार, 1 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असले तरी शाळा नियोजित तारखेलाच सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने सोमवारी स्पष्ट केले. याबाबत आरोग्य विभागापाठोपाठ शिक्षण विभागानेही मार्गदर्शक सूचनाही प्रसृत केल्या असून, गर्दी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत.
सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि शहरी भागांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. आता 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता. आरोग्य विभागाने आणि डॉक्टरांच्या कृतिगटाने त्यास मंजुरी दिली होती. मात्र, ओमिक्रॉनच्या भीतीमुळे प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही, असा प्रश्न निर्माण झाला.
ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होतो. लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले, तरी शाळांचे दररोज र्निजतुकीकरण करावे लागेल. सुरक्षित अंतराचे पालन करणे शक्य होणार नाही. अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या मर्यादित असल्याने मुलांची वर्गात गर्दी होईल. या सर्व बाबींचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जावा, अशी मागणी केली जात आहे.
दुसरीकडे, शिक्षण विभागाने बुधवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकावा, अशी मागणी होत असली तरी बुधवारपासून शाळा सुरू केल्या जातील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. काही पालकांनी शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे. ओमिक्रॉनमुळे मुलांना शाळेत पाठवण्याबाबत अनेक पालक संभ्रमावस्थेत असल्याचे दिसते. शाळा सुरू करण्यास आरोग्य विभागाचा हिरवा कंदील असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आरोग्य विभागापाठोपाठ शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागानेही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र, पालक अद्यापही संभ्रमावस्थेत असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.
जाणून घ्या सुचना काय आहेत?
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे करोना लसीकरण (दोन्ही मात्रा) बंधनकारक असून त्यांनाच शाळा व कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा.
विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मुखपट्टीने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर गर्दीचे कार्यक्रम अथवा एकमेकांशी संपर्क होईल, अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असतील.
शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाइन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठकव्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी त्या गावातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. गर्दी टाळण्याकरिता पालकांना शाळांच्या आवारात परवानगी देण्यात येऊ नये. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत.
शाळेतील एखादा विद्यार्थी करोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षकांची गावांमध्येच शक्यतो मुक्कामाची व्यवस्था करावी.
मंत्रिमंडळ बैठकीत ओमिक्रॉनबाबत चिंता
ओमिक्रॉन विषाणूच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करोनास्थितीबाबत चर्चा करण्यात आली. परदेशातून येणार्या प्रवाशांबाबत सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले असून, त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
‘डब्ल्यूएचओ’चा इशारा
‘ओमिक्रॉन’ हा अन्य करोना विषाणूंच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य किंवा घातक असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्याचा फैलाव जगभर वेगाने होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करीत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगाला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. ‘ओमिक्रॉन’ने मृत्यू झाल्याची नोंद नाही. परंतु आधीचा संसर्ग त्याचबरोबर लशीमुळे निर्माण झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीला तो कसा प्रतिसाद देतो, याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत 13 देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत 15 डिसेंबरपासून शाळा सुरू
राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीतील शाळा आता 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.