पनवेलच्या डोनेशन घेणार्‍या शाळांची ‘शाळा’ घेतली जाणार

रायगड शिक्षणधिकार्‍यांची चौकशी समिती गठीत
| पनवेल | वार्ताहर |

नुकताच देशासह महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडून आर्थिक संकटातून मोकळा होत असतानाच पनवेल तालुक्यातील खाजगी शाळा पालकांकडून डोनेशन घेऊन लुट करीत असल्याच्या तक्रारीची दाखल घेवून प्रहार जनशक्ती पक्षाने शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.


महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (देणगी प्रतिबंध कायदा 1987) अंतर्गत बालकांच्या सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचा कायदा असून पनवेल तालुक्यातील अनेक खाजगी शाळांकडून या कायद्याची पायमल्ली होत असल्याची तक्रारही प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस यांनी रायगड जिल्हा प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली होती. पनवेल तालुक्यातील खाजगी शाळांकडून डोनेशन घेण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे लक्षात घेऊन रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी या शाळांची चौकशी करून डोनेशन घेणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासाठी आठ सदस्यांची समिती स्थापन केली असून शाळांचे दप्तर तपासण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सदर चौकशीत दोषी आढळून आलेल्या शाळांवर कठोर कारवाई करावी तसेच पालकांकडून प्रवेश फी व विकासनिधीच्या नावाखाली डोनेशन घेतलेले पैसे परत करावेत त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील ज्या पालकांकडून शाळांनी डोनेशन घेतले आहे त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन संतोष गवस यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.

पनवेलमधील 12 शाळांचा समावेश
प्रवेश फी, डोनेशन फीच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांची पिळवणूक करणार्‍या 12 शाळांची तक्रार शिक्षणाधिकार्‍यांना प्राप्त झाल्या आहे. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गवस यांनी या शाळांवर कारवाईची मागणी केली आहे.

Exit mobile version