प्रज्ञान रोव्हरने सुरू केला प्रवास
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चांद्रयानाच्या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडले असून रोव्हर आता चंद्रावर फिरत आहे. लँडरमधील कॅमेऱ्यात रोव्हरचा प्रवास कैद झाला आहे. इस्रोने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर करत माहिती दिली आहे.
प्रज्ञान रोव्हर दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी शिवशक्ती पॉइंटभोवती फिरत आहे. असं कॅप्शन टाकून इस्रोने व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये रोव्हर चंद्रावर फिरत असल्याचं दिसत आहे.
प्रज्ञान रोव्हर लँडरमधून खाली उतरतानाचा व्हिडिओ इस्रोकडून शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता रोव्हर चंद्रावर फिरत असून चंद्रावर असलेल्या मातीचे नमुने, मातीमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणाचा शोध, लँडरचे फोटो काढणे या गोष्टी करण्यात येणार आहेत.