। खोपोली । प्रतिनिधी ।
घरकुलासाठी मंजूर निधीचा दुसरा हप्ता नऊ महिने उलटून देखील जमा न झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन वास्तूत प्रवेश करण्याचे चार कुटुंबाचे स्वप्न अर्धवट राहणार आहे. खालापूरातील पाच कुटुंबाना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर झाले होते. साधारण नऊ महिन्यापूर्वी सव्वा लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. त्यामुळे या रकमेत घराच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. घराचे अर्धवट काम झाल्यावर उर्वरित कामासाठी सव्वा लाखाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी चार कुटुंब पाच महिने समाज कल्याण विभाग अलिबाग कार्यालयात फेर्या मारत आहेत. परंतु तेथील अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत आहेत. वाढत्या महागाईमुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य किंमती देखील गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सव्वा लाखाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी होत असलेला उशीर यामुळे घराचे बजेट आवाक्याबाहेर जाणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची हजेरी असते. त्या अगोदर अर्धवट राहिलेले घराचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून नवीन वास्तुत प्रवेश करण्याचे स्वप्नावर समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईने पाणी फेरले आहे. दरम्यान याबाबतीत समाजकल्याण विभागातील अधिकारी मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल बंद येत होता.
चार ते पाच फेर्या समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात मारल्या. आज जमा होतील, उद्या जमा होतील अशी उत्तर तेथील अधिकारी देत आहेत. पैसे आलेत ट्रेझरीत आहेत अशी उत्तर मिळत आहेत. -अरुण बोंबे, लाभार्थी रमाई घरकुल खालापूर







