| मुंबई | प्रतिनिधी |
जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवलेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान गाजवण्याची संधी मिळणार असून एशियन लिजंड्स लीगचा दुसरा हंगाम 19 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. या हंगामात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 14 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.
वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपने (यूएई) मंगळवारी मुंबई येथे अधिकृतपणे एशियन लिजंड्स लीगच्या दुसऱ्या हंगामाच्या शुभारंभाची घोषणा केली. यावेळी आयपीएलप्रमाणेच इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्याची घोषणा करण्यात आली. लीगच्या तांत्रिक समितीचे संचालक मदन लाल म्हणाले की, या हंगामामध्ये आम्ही आयपीएलप्रमाणेच इम्पॅक्ट प्लेयर या क्रिकेटचा रोमांच वाढवणाऱ्या नियमाचा समावेश केला आहे. यामुळे स्पर्धेत अधिक प्रभावी रणनीती, लवचिकतेमुळे अधिक मनोरंजन होईल. लीगमध्ये माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे, हा नियम संपूर्ण वेळापत्रकात ऊर्जा, संतुलन आणि गुणवत्ता राखण्यास मदत करेल. एशियन लीजेंड्स लीग ही केवळ स्पर्धा नाही, तर ती निवृत्त दिग्गज खेळाडूंची आशिया चषक स्पर्धाच आहे. ही स्पर्धा मैदानातील जुन्या प्रतिस्पर्धेला पुन्हा जिवंत करेल आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणाऱ्या महान खेळाडूंना एकत्र आणेल. प्रत्येक फ्रँचायझी राउंड-रॉबिन फॉरमॅटनुसार 6 साखळी सामने खेळेल. दुसऱ्या हंगामामध्ये एकूण 25 सामने होतील. यात 21 साखळी सामने आणि 4 नॉक आऊट लढतींचा समावेश असेल.






